'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

पृथ्वीची तिरडी
(एरव्ही परडी
फुलांनी भरली !)
जळो देवा,भली !!
...कविता संपली आणि वर्गात शांतात पसरली. 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेचे वर्गात वाचन सुरु होते. बारावीला सगळे विषय केवळ गुणांच्या आकडेमोडीत अभ्यासले जातात. मराठी काही अपवाद नव्हे, त्यामुळे अभ्यासक्रमाला असलेल्या कवितादेखील परीक्षेनंतर लक्षात राहत नाही की मनावर परिणाम सोडत नाही. या कवितेबाबत मात्र काही वेगळे घडले. मर्ढेकर या कवीचे 'नव्याने' ओळख झाली.
बाळ सीताराम मर्ढेकर नावाच्या जादूची ओळख झाली ती त्यांच्या 'गणपत वाणी बिडी पितांना' ह्या कवितेतून. पुढे अजून एक कविता वाचनात आली, ' पिपांत मेले ओल्या उंदीर'. ह्या दोन्ही कविता शाळकरी पोरवयात वाचलेल्या होत्या. तेव्हा 'आधुनिक कविता' वगैरेंची फारशी मैत्री नव्हती, बालकवी,केशवसुत, कवी बी, ह्यांच्यापलीकडे झेप घेतली नव्हती. त्यामुळे ह्या दोन्ही कविता मला कितपत कळल्या होत्या ठाऊक नाही.फार भारावून जाणे अशातला प्रकार घडला नव्हता. शाळेला पाठ्यक्रमात मर्ढेकरांची पहिल्यांदा कविता अभ्यासाला आली, 'पितात सारे गोड हिवाळा'. मुंबईच्या हिवाळ्यातील पहाटेचे एक चित्रदर्शी पण नेहमीच्या वर्णनापेक्षा काहीसे हटके चित्रण होते.हा कवी वेगळा आहे ही जाणीव पहिल्यांदा झाली. 'भारावून जाणे' म्हणजे काय असते हे मात्र 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेने जाणवले. द्वितीय महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कविता लिहिली होती. 'मर्ढेकर' अभ्यासायला हवा हे मनात आले. 'मर्ढेकरांची कविता' हे छोटेखानी पुस्तक वाचनालयातून आणले.
mardhekaranchi_kavita.jpg
'मर्ढेकरांची कविता' हा संग्रह म्हणजे त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेल्या तीन कवितासंग्रहांचे(शिशिरागम,काही कविता, आणखी काही कविता ) आणि मोजक्याच(एकूण ९) अप्रकाशित कवितांचे संकलन आहे.
'शिशिरागम' मधील कविता रविकिरण मंडळाशी इमान राखणाऱ्या आहेत, तरल आणि भावप्रधान. बहुतेक कविता 'सुनीत' वृत्तात रचल्या आहेत.
" सूर कशाचे वातावरणी ?
सळसळ पानांची ? वा झरणी ?
खळखळ, ओहोटीचे पाणी ?
किलबिल शिशिरी केविलवाणी ?
कुणास ठाऊक ! डोळयां पाणी
व्यर्थ आणता; नच गार्‍हाणी
अर्थ; हासुनी वाचा सजणी
भास !- जरी हो खुपल्यावाणी.
या कवितेने काव्यसंग्रहाची सुरवात होते. कवितांना शीर्षक नाहीत, क्रमांक आहेत. 'शिशिरागम' ही पहिली कविता. बहुतेक कविता या शृंगाररसातील आहेत. चित्रदर्शी आणि गेय आहेत,बालकवी किंवा गुरुदेव ठाकुरांची आठवण करून देणार्‍या.
उदा.
" माळावरल्या बांधावरती विलोलनयना जरा
थांबली कटी ठेवुनी करा "
किंवा
" वाचन-मग्न पर्णकुटीच्या दारि उभी टेकुनी
कपोला अंगुलीवर ठेवुनी "
ही कविता.
" कोणी नको अन काही नको, देवता तू एकली !
हृदय जीते अर्पिले हे होऊनी बद्धांजली ! "
अशा प्रेयसीला देवतेच्या स्थानी ठेवणाऱ्या कविताही आहेत.(ज्या प्रकाराची आचार्य अत्र्यांनी थट्टा उडवली होती.)
एकूण वीस कवितांचा हा संग्रह खरेतर 'अमर्ढेकरी' आहे. पहिलाच काव्यसंग्रह म्हणून कदाचित मर्ढेकरांनी धोका पत्करला नसावा असे वाटत राहते.
दुसऱ्या काव्यसंग्रह आपण एक नवा काव्यप्रकार मराठी साहित्यात आणत आहोत ह्याची त्यांना जाणीव होती, हे त्याच्या प्रास्ताविकात दिसून येते. त्यांनी या काव्यसंग्रहाचे नाव 'कांही कविता' बुद्ध्याच ठेवले असावे हेदेखील लक्षात येते.
"
'शिशिरागम' प्रसिद्ध झाल्याला आठ वर्षे झाली. त्यानंतरच्या ह्या पाचपन्नास कविता.
शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहिणं फारसं कठीण नसतं. त्यापलीकडे काही पुढील लिखानांत आहे किंवा नाही हे वाचकाच ठरविणार. त्यांचं मत अनुकूल पडलं नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा. पण 'भूमिके'चा टोप चढवून आणि तळटिपांचे पैंजण घाकून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही.'
"
ज्ञानदेव- तुकारामांनी क्रांती घडवून आणायला ओव्या-अभंगांचा वापर केला.मर्ढेकरसुद्धा 'कांही कविता'ची सुरवात अभंगाने करतात,हा योगायोग नव्हे. आधुनिकतेचा साज लेउनी आलेल्या अभंग-ओव्या हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य ! नमनालाच
माझा अभंग माझी ओवी | नतद्रष्ट गाथा गोवी,
इंजिनावीण गाडी जेंवी । घरंगळे ॥
कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ | कुठे तुकाराम पवित्र,
कुठे समर्थ धीरोदात्त| संत सर्व ||
संत शब्दांचे नायक | संत अर्थांचे धुरंदर ;
एक शब्दांचा किंकर | डफ्फर मी ||
ही कविता आहे. या कवितेतून असे वाटते की या नव्या उपक्रमाबद्दल मर्ढेकर थोडे साशंक असावेत. ते शेवटी म्हणतात,
अहो शब्दराजे, ऐका । लाज सेवकाची राखा;
नाही तरी वरती काखा । आहेत ह्या ॥
"कांही कविता"तील कविता उघड्यानागड्या आहेत, रोखठोक आहेत,उपहासगर्भ आहेत, दुसर्‍या महायुद्धाच्या क्रौर्याचा परिणाम इथे दिसेल नि मुंबईतील चाकरमान्यांच्या जीवनशैलीतील अपरिहार्यावर केलेले भाष्यही दिसेल. इथे प्रतिमांचा मुक्त वावर आहे.शब्दांची नाविन्यपूर्वक योजना आहे, इंग्रजी शब्दांचा आणि मराठी काव्यपंक्तींचा कल्पकतेने केलेला वापर आहे. पुढे जी ’मर्ढेकरी शैली ’म्हणून ओळखली गेली तिचा प्रत्यय "कांही कविता"त येतो.
लेखाच्या सुरवातीला आलेली 'प्रेमाचे लव्हाळे' ही या काव्यसंग्रहातील पहिली कविता. दुसऱ्या महायुद्धाची भीषणता, त्यातून दिसलेली संवेदनाहीनता ह्यांचे दर्शन करवणारी ही कविता.
" प्रेमाचे लव्हाळे '
सौंदर्य नव्हाळे,
शोधूं ?
-आसपास "
असा सवालच मर्ढेकर करतात.
दुसऱ्या अभंगरूपी कवितेत मर्ढेकर म्हणतात,
" अज्ञानी जनांस | ज्ञान पाजू नये
मारुनी उरावे | धडरूपे ||
दे गा हेची दान | देवा, माझी हाडे
खाउनी गिधाडे | तृप्त व्हावी ||
तिसरी कविता म्हणावी तर तुकारामांच्या 'जे का रंजले गांजले' चे विडंबन आहे, म्हणावी तर राजकारणाच्या खालावत्या स्तरावर केलें प्रहर आहे.
" जे न जन्मले वा मेले | त्यांसी म्हणेजो अपुले,
तोचि मुत्सद्दी जाणावा | देव तेथे ओळखावा ||
मोले धाडी जो मराया | नाही आंसू आणि माया
त्यासी नेता बनवावे | आम्हां मेंढरांस ठावे ||
पाकिस्तानच्या मागणीवरून उसळलेल्या दंगलीवर केलेले,
"कां हो माजवितां दुही । माखतां स्वातंत्र्याची वही
स्वजनरक्ताने प्रत्यहीं । लळथळां ॥ "
खरे तर "कांही कविता"तील कवितांविषयी इतके काही सांगण्यासारखे आहे की प्रत्येक कवितेवर स्वतंत्र लेख व्हावा. मर्ढेकरांनी योजलेल्या काही शब्दरचना थेट अंगावर येतात.
’विज्ञान-उणे-माणुसकी’ वर भाष्य करणारी,
" जाणे शुद्ध शुचिर्भूत ।एक प्रायोगिक सत्य ,
जरी त्याचेंच अपत्य । हिरोशिमा ॥
किंवा
संवेदनाहीनतेवर भाष्य करणारी
" गळे अश्रूंवीण चरबी । तीच अज्ञानाची छबी ;
झाले ते खत आणि बी | तुझ्या मळां ॥ "
किंवा
" टिर्‌र्‍या अर्धपोट ।जोवरी आहेत,
ओंगळ समस्त । आम्ही नंगे ! ॥ "
"पिपांत मेले ओल्या उंदिर" ही या काव्यसंग्रहातील एकविसावी कविता. प्रथम ’अभिरुचि’ मासिकात प्रकाशित झालेल्या या कवितेने घडविलेला इतिहास सर्वज्ञात आहे. ह्या कवितेत वापरलेल्या प्रतिमांचा मागोवा घेणे मनोरंजक ठरते. नाझी छळछावण्यांतील ज्यू कैदीं की गिरणी कामगार ? हे द्वंद्व बाजूला सारले तरी दोहों अर्थांनी कविता सखोल परिणाम करणारी ठरते.
गिरणी कामगारांच्या जीवनशैलीचे चित्र चितारतांना,
काळ्या बंबाळ अंधारीं
धपापतें हें इंजिन;
कुट्ट पिवळ्या पहाटीं
आरवतो दैनंदिन
भोंगा.-
"घन:श्यामसुंदर श्रीधरा गिरिणोदय झाला,
उठि लवकरि दिनपाळी......"

- गोंगाटला सारा
कामगारवृंद आणि
कोंबटशा पिळी धारा
अशी रचना मर्ढेकरच करू शकतात.
"आणखी कांही कविता" हे "कांही कविता"चाच पुढचा भाग आहे म्हणायला हरकत नाही.
मर्ढेकरांच्या आधुनिक कविता जेव्हा प्रकाशित होऊ लागल्या होत्या, तेव्हा त्या अनेकांच्या पचनी पडल्या नव्हत्या. त्यांच्या कवितेची साहित्यवर्तुळात बरीच टर उडवण्यात आली होती. दुर्बोधतेचे आणि अश्लीलतेचे आरोपही ठेवण्यात आले होते. ह्या सार्‍या घडामोडींचे प्रतिबिंब "आणखी कांही कविता"त उमटते.
"काळ्यावरती जरा पांढरे
ह्या पाप्याच्या हातुन व्हावे
फ़क्त तेधवा:आणि एरव्ही
हेंच पांढर्‍यावरती काळें ! "
ह्या ओळींतून
किंवा
" भंगुं दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनीचें;
येउं दे वाणींत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे " या कवितेतून त्याची साक्ष पटते.
"आणखी कांही कविता" "कांही कविता"पेक्षा अधिक भेदक आहे. आशय, प्रतिमांचा वापर ह्याबाबत अधिक मर्ढेकरांची प्रतिभा अनेकविध अंगांनी बहरते.
एकूण पस्तीसच कविता असल्या तरी प्रत्येक कविता अगदी बावनकशी आहे. इथे आपण हरखून कवितांचा आस्वाद घ्यायचा आहे. एकेका कवितेअंती आपल्या जाणीवा विस्तारत जातात. त्यांच्या कविता वाचतांना कुठेकुठे बांग्ला आधुनिक कवी आणि मर्ढेकरांचे समकालीन जीबोनानन्दो दासांची आठवण येते,विशेषत: मुंबई शहरी जीवनाच्या अनुषंगाने येणार्‍या कवितांमध्ये.
"मी एक मुंगी, हा एक मुंगी " या कवितेतल्या.
- सर्वे जन्तु रुटिना : । सर्वे जन्तु निराशया: ॥
सर्वे छिद्राणि पंचन्तु । मा कश्चित्‌ दु:ख-लॉग भरेत्‌ ॥
ह्या ओळी हल्लीच्या आय.टी.च्या कारकुनांना अगदी आपल्यासा वाटल्या तर नवलाई नाही.
"जिथे मारते कांदेवाडी ", "गणपत वाणी ", " ह्या गंगेमधि गगन वितळले" ,"खप्पड बसली फ़िक्कट गाल"," किती दिवसांत नाही चांदण्यांत गेलो" ह्या अजून काही "वाचाव्याच" अशा आणखी काही कविता.
"मर्ढेकरांची कविता" हा संग्रह वाचायचा नाही तर अनुभवायचा आहे. पन्नास वर्षांनंतरही ह्यांतल्या कवितांची प्रासंगिकता कायम आहे. एकेक कविता निवांत वाचावी,प्रतिमा हळूहळू उलगडत जातांना आपल्या हाती मर्ढेकरांना केवळ सलाम करणे राहते. ’शिशिरागम’ ते ’आणखी कांही कविता’ हा प्रवास मर्ढेकरांच्या कवितांचाच नसतो तर मराठी साहित्याच्या एका महत्त्वाच्या स्थित्यंतराचा इतिहास असतो. ’रविकिरण संप्रदायी’ कविता ते ’मर्ढेकरी’ आधुनिक कविता हा इतिहास आपण अनुभवत असतो. त्याचक्षणी विश्वयुद्ध क्र.२ आणि त्यानंतरचे १०-१५ वर्षे हा काळ एका संवेदनशील कवीच्या नजरेतून अनुभवत असतो. उण्यापुर्‍या १२८ कवितांचा हा संग्रह अलगद मनात व्यापून उरतो अन्‌ एक गुणगुण ऐकू येते,
" ह्या सृष्टीच्या निवांत पोटीं
परंतु लपली सैरावैरा,
अजस्र धांदल, क्षणात देइल
जिवंततेचे अर्घ्य भास्करा.
थांब ! जरासा वेळ तोंवरी-
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल.
उरे घोटभर गोड हिवाळा!
"

पुस्तकाचे नाव : मर्ढेकरांची कविता
प्रथमावृत्ती : १९५९
पुनर्मुद्रण : १९९४
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
किंमत : ४० रुपये


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय